नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान शिंजो आबे गोल्फ खेळत असताना तोल जाऊन खाली कोसळतात, मात्र काही वेळातच स्वत:ला सांभाळत उभे राहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिंजो आबे यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील तिथे उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच आशिया खंडाच्या दौ-यावर होते. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळत असताना ही घटना घडली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, सफेद रंगाची जर्सी घातलेले शिंजो आबे तोल गेल्यामुळे खाली मैदानातच कोसळतात. उतार असल्या कारणाने शिंजो आबे घरंगळत खाली येताना दिसत आहे. पण काही वेळातच ते स्वत:ला सांभाळतात आणि उठून उभे राहतात.
पण जेव्हा शिंजो आबे कोसळले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. डोनाल्ड ट्रम्प आपल्या सहका-यांसोबत पुढे निघून जात असल्याने शिंजो आबे खाली पडल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यांना कळण्याआधीच शिंजो आबे उठून उभे राहिले होते. पण व्हिडीओ मात्र संपुर्ण जगभरात व्हायरल झाला आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा शिंजो आबे अमेरिका दौ-यावर गेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासोबत गोल्फ खेळले होते. त्यामुळे आशिया दौ-यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना असलेली गोल्फची आवड लक्षात घेता शिंजो आबे यांनी त्यांच्यासोबत गोल्फ खेळायचं ठरवलं होतं.