टोकिओ : इसिसच्या ताब्यात असणा-या जपानच्या दुस-या ओलिसाचाही शिरच्छेद करण्यात आला असून, तशी चित्रफीत जारी करण्यात आली आहे. या शिरच्छेदाचा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून निषेध केला जात असून, जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी हे घृणास्पद व निषेधार्ह कृत्य असल्याचे म्हटले आहे. ४७ वर्षांचे जपानी पत्रकार केनजी गोटो यांचा शिरच्छेद करण्यात आला असून, एका आठवड्यात जपानच्या दोन नागरिकांना इसिसने ठार मारले आहे. या हत्येची चित्रफीत आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात आली असून, जॉर्डनच्या ओलिसाचा या चित्रफितीत उल्लेख करण्यात आलेला नाही. आधीच्या शिरच्छेदाच्या चित्रफितीतही हाच मारेकरी दिसत असून, त्याचे नाव जिहादी जॉन असल्याचे वृत्त आहे. आईचे दु:ख केनजी गोटो याची आई जुंको इशिदो दु:खाने कोसळली आहे. माझे हृदय फाटले आहे, बोलण्यास शब्दही नाहीत असे तिने म्हटले आहे. सिरियातील लोकांची स्थिती जगाच्या नजरेसमोर आणण्यासाठी गोटो यांनी साहसाने लढा दिला असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. इराकमध्ये १,३७५ जण ठारबगदाद : गेल्या जानेवारी महिन्यात इराकमध्ये हिंसाचारात ७९० नागरिकांसह १,३७५ जण ठार व २,२४० जण जखमी झाले आहेत. इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या मदत मोहिमेने निवेदनात ही माहिती रविवारी दिली. मोठा भूभाग गेल्या वर्षी इसिसने ताब्यात घेतल्यापासून इराकचे सैन्य पुन्हा सावरायचा प्रयत्न करीत आहे; परंतु या संघर्षात त्याचे ५८५ जण जीव गमावून बसले आहेत.
जपानच्या दुस-या ओलिसाचाही शिरच्छेद
By admin | Published: February 02, 2015 1:10 AM