चंद्रावर पोहोचणारा जपान हा जगातील पाचवा देश बनलेला असला तरी चंद्रमोहिमेला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी जपानचा रोबोटिक स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग द मून (SLIM) हा यशस्वीरित्या चंद्रावर उतरला, परंतु सौरऊर्जा निर्मितीत समस्या आल्याने हे यान अखेरची घटका मोजू लागले आहे.
जपानने २० जानेवारीला मध्यरात्री चंद्राच्या पृष्ठभागावर हा उपग्रह उतरविला आहे. जपानी अंतराळ संस्था जक्सानुसार जपानचा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करण्यात यशस्वी झाला आहे. स्लिम हे यान चंद्राच्या शियोली क्रेटरनजीकची माहिती पाठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, लँडरवर असलेला सौर ऊर्जा सेल नादुरुस्त झाला आहे. यामुळे पुरेशी वीज निर्मिती होऊ शकत नाहीय, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पुरेशी वीज निर्मिती होत नसल्याने लँडर बॅटरी मोडवर गेला आहे. यामुळे हे यान काही तासच काम करू शकेल असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जक्साच्या शास्त्रज्ञांना यामुळे प्रयोग करण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला आहे. येत्या आठवड्यात जर सूर्याची किरणे बदलली आणि पॅनलवर पडली तर लँडर पुरेशी सौरऊर्जा निर्माण करेल अशी आशा या तज्ञांनी व्यक्त केली आहे.
परंतु सध्यातही या लँडरचे भविष्य अधांतरीच आहे. जपानने स्लीमला ६ सप्टेंबरला लाँच केले होते. २५ डिसेंबरला हा लँडर चंद्राच्या कक्षेत पोहोचला होता. परंतु लँडिंग करण्यापूर्वी तीन चार आठवडे सिस्टिम तपासणीतच गेले होते.
काय होते वेगळेपण...आत्तापर्यंत चंद्रावर पाठवलेल्या सर्व यानांमधुन हे अंतराळयान अतिशय खास होते. याचे कारण पिन पॉइंट लँडिंग होते. खरं तर, आतापर्यंत अंतराळ यानाला एक प्रचंड क्षेत्र देण्यात आले आहे, ज्यामध्ये ते हवे तिथे उतरू शकत होते. पण स्लिमला फक्त 100 मीटर एवढीच जागा देण्यात आली होती ज्यात उतरायचे होते. हे देखील मोठे यश आहे.