आपल्या भारतामध्ये घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. पण तिकडे फ्रान्समध्ये मागच्या ३१ वर्षांपासून एका सोन्याच्या घुबडाचा शोध घेतला जात होता. संपूर्ण फ्रान्स त्या घुबडाचा शोध घेत होता. त्या घुबडाच्या शोधासाठी जागोजागी खोदकाम सुरू होतं. अखेर या घुबडाला खोदकाम करून जमिनीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यासोबतच आता या घुबडाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, हे घुबड सापडले आहे, अशी घोषणाही करण्यात आली आहे.
आज डिस्कॉर्ड फोरमवर मिशेल बेकर नावाच्या एका व्यक्तीने लिहिले की, सोनेरी घुबडाला शोधून काढण्यात आलं आहे, अशी आम्ही अधिकृत घोषणा करतो. हे घुबड जमिनीतून खोदून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता या घुबडाच्या शोधात कुठेही खोदकाम करू नका. दरम्यान, या पोस्टमध्ये हे घुबड कुठे सापडलं आणि ते कुणी शोधून काढलं, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. दरम्यान, मिशेल बेकर याच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
फ्रान्समधील एक कादंबरीकार मॅक्स व्हॅलेंटाइन यांनी २३ एप्रिल १९९३ रोजी एका गुप्त ठिकाणी सोन्याच्या घुबडाची पितळेची प्रतिकृती लपवली होती. त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये घुबडापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगितला होता. त्यासाठी ११ कोडी घालण्यात आली होती. त्यात काही गणितासंबंधीचे काही प्रश्न होते. काही शाब्दिक खेळ आणि इतिहासाबाबतच्या गोष्टी होत्या. या घुबडाला शोधून आणणाऱ्या व्यक्तीला सोन्याचं घुबड बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. २००९ मध्ये मॅक्स व्हॉलेंटाइन यांचा मृत्यू झाला, तेव्हा मिशेल बेकर यांनी या मोहिमेची जबाबदारी सांभाळली होती.
तेव्हापासून संपूर्ण फ्रान्समधील लोक या खजिन्याचा शोध घेत होते. लोकांना आपल्या घराच्या आजूबाजूला, जंगलांमध्ये या घुबडाच्या शोधात खोदकाम केलं. या घुबडामध्ये एक गोपनीय संदेश लपवून ठेवला होता, असे सांगण्यात येत होते. तसेच जो कुणी हे घुबड शोधून आणेल, त्याला हा संदेश दाखवावाला लागेल, अशी अट घालण्यात आली होती. या घुबडाच्या शोधात अनेक लोकांनी आपलं आयुष्य खपवलं होतं. अखेरीस आज हा घुबड सापडल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घुबडाचा शोध मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून घेण्यात आला, असावा असा दावा काही लोक करत आहेत.