Javed Akhtar News : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhatar) स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी सार्वजनिक मंचावरुन आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले आहे. आता त्यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानालाच सुनावून आले आहेत. लाहोर येथे आयोजित फैज महोत्सवात जावेद यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानवर निशाणा साधला. 'तुमच्या देशात अजूनही दहशतवादी फिरत आहेत,' असे जावेद अख्तर म्हणाले. जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जावेद अख्तर यांचा पाकिस्तानला टोला फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये जावेद अख्तर म्हणाले - 'आम्ही नुसरत आणि मेहदी हसनसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. जाऊद्या...आता एकमेकांना दोष देऊन फायदा नाही. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही पाहिला आहे. ते लोक नॉर्वेमधून किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचे काम नाही,' असे जावेद अख्तर म्हणाले.
रसिकांनी केले कौतुक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात दिलेल्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटले आहेत. त्यांच्या विधानाचे लोकांनी कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले - आम्हाला पूर्ण मुलाखत पाहायला मिळाली तर छान होईल. दुसर्याने लिहिले - खूप छान. तिसऱ्या एकाने लिहिले - याला देशभक्ती म्हणतात. यावेळी एका युजरने त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. एकाने हिलिले – म्हणूनच जावेद साहेबांसाठी माझ्या मनात प्रेम आहे. काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये टाळ्या वाजवणारे इमोजी पाठवले आहेत. तर कोणी म्हटलं की जावेद अख्तरबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर आणखी वाढला आहे.
अली जफरसोबत जावेद यांचे सत्रपाकिस्तानी गायक अली जफरसोबत जावेद अख्तरचे युगल गाणे सोशल मीडियावर पसंत केले जात आहे. या जॅम सेशनच्या व्हिडिओमध्ये अली जफर किशोर कुमारचे जिंदगी आ रहा हूँ मैं गाणे गात आहे. व्हिडिओमध्ये जावेद अख्तर आणि अली जफर लोकांमध्ये बसलेले आहेत. वातावरण संगीताने भरलेले आहे. जावेद आणि अलीच्या या जॅम सेशनने लोकांना खूश केले आहे. लाहोरमध्ये 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय फैज महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जावेद अख्तर यांनी महोत्सवात मुशायरात सहभाग घेतला आणि त्याचे नवीन पुस्तकही लाँच केले.