ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २४ - ब्रसेल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यासाठी जेट एअरवेज आपली 3 विमाने पाठवणार आहे. अॅम्सटरडॅमहून ही विमाने उड्डाण करणार असून मुंबई, दिल्ली आणि टोरंटो या 3 शहरात लँडींग करणार आहेत. ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल आहे. बेल्जियममधील ब्रसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये जेट एअरवेजचे 2 क्रू मेंबरदेखील जखमी झाले आहेत.
जेट एअरजवेजच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 9W 227 हे विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता अॅम्सटरडॅमहून मुंबईसाठी उड्डाण करणार आहे. तर 9W 1229 हे विमान 4 वाजता दिल्लीसाठी उड्डाण करेल. अॅम्सटरडॅमहून एक विमान टोरंटोसाठी पाठवण्यात येणार आहे. 9W 1230 हे विमान 6 वाजता उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.
ब्रसेल्स विमानतळावर नेमके किती प्रवासी अडकले आहेत याबाबत मात्र जेट एअरजवेजने कोणतीच माहिती दिलेली नाही. युरोपमधून बाहेर पडण्यासाठी जेट एअरजवेजच्या दृष्टीने अॅम्सटरडॅम हे प्रमुख ठिकाण असणार आहे. ब्रसेल्स विमानतळ मात्र गुरुवारीदेखील बंदच राहणार आहे.