ऑनलाइन लोकमत
बैरूत, दि. २० - ' इसिस' या जागतिक दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील अनेक बंदीवानांचा अतिशय क्रूरपणे शिरच्छेद करणारा 'जिहादी जॉन' हा दहशतवादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त असून असून इसिसने या बातमीला दुजोरा दिला आहे. मोहम्मद एमवाझी उर्फ जिहादी जॉन नावाने ओळखला जाणारा जॉन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच ड्रोन हल्ल्याच मृत्यूमुखी पडला. 'दाबिक' या ऑनलाइन मॅगझीनमधून इसिसने जिहादी जॉनचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. जिहादी जॉन हा ब्रिटीश नागरिक होता आणि गेल्यावर्षी त्याची ओळख पटली होती.
सीरियातील इसिसचा प्रभाव असलेल्या 'राक्काट शहरात मोटारीतून जात असताना जिहादी जॉनच्या मोटारीवर ड्रोनमधून हल्ला करण्यात आला होता. १२ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यात जॉनची मोटार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि गंभीर जखमी झालेला जिहादी जॉन ठार झाला, असे या मॅगझीनमध्ये म्हटले आहे.
जिहादी जॉन प्रवास करत असलेल्या वाहनावर अमेरिकेच्या ड्रोन विमानाने हल्ला केल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. या वृत्तात तथ्य असल्याचे इसिसनेही स्पष्ट केले.