JK Rowling Death Threat: भारतीय वंशाचे वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये क्रूर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने स्टेजवर चढून त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. 'हॅरी पॉटर'च्या लेखिका जेके रोलिंग (JK Rowling) यांनी रश्दींच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यामुळे आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जेके रोलिंग यांनी ट्विट करत त्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी लिहिले - 'अशा प्रकारच्या घटनांमुळे खूप दुःखी झाले आहे. लवकर बरे व्हा.' जेके रोलिंग यांच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले - 'काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचा आहे.' या धमकीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट जेके रोलिंग यांनी शेअर केला आहे.
पाहा स्क्रीनशॉट
जेके रोलिंग यांनी या धमकीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच ट्विटरवर अनेक स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले- 'ट्विटर, हीच तुमची मार्गदर्शक तत्त्वे आहेत का? तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा लोकांच्या समूहाविरुद्ध हिंसेची धमकी देऊ शकत नाही. आम्ही हिंसेचा गौरव करत नाहीत.'
सलमान रश्दी यांची तब्येत कशी आहे?'द सॅटनिक व्हर्सेस' या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी(वय 75) यांच्यावर शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे ते एक डोळा गमाविण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या यकृतालाही दुखापत झाली आहे. पेनसिल्वानिया येथील एका रुग्णालयामध्ये रश्दी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. न्यूयॉर्क येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात हादी मतार नावाच्या व्यक्तीने रश्दींवर 15 हून अधिक वार केले आहेत.