इस्लामाबाद : जम्मू-काश्मिरात अनेक हिंसक कारवाया घडवून आणणाऱ्या ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (जेकेएलएफ) संघटनेच्या संस्थापकांपैकी एक अमानुल्ला खान (८०) याचे मंगळवारी पाकिस्तानात निधन झाले. ब्रिटनमधील भारतीय मुत्सद्दी रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण व नंतर करण्यात आलेली हत्या व ८० च्या दशकातील भारतीय विमानाच्या अपहरणासह खोऱ्यातील अनेक हिंसक कारवायांत जेकेएलएफचा हात होता. फुफ्फुस विकाराशी संबंधित गुंतागुंत वाढल्यामुळे खानला तीन आठवड्यांपूर्वी रावळपिंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९८६ मध्ये पाकिस्तानला प्रत्यार्पण होण्यापूर्वी तो लंडनमध्ये वास्तव्याला होता. १९८४ मध्ये ब्रिटनमधील भारतीय उच्यायुक्तालयातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या करण्यात आली होती. खान हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे मानण्यात येते. जेकेएलएफचा नेता मकबूल भटची भारतीय तुरुंगातून सुटका करवून घेण्याच्या उद्देशाने म्हात्रेंचे अपहरण आणि नंतर हत्या करण्यात आली होती. भटला १९८४ मध्ये तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. १९७१ मध्ये लाहोरला जाणाऱ्या प्रवासी विमानाचे अपहरण केल्याप्रकरणी भट अटकेत होता. खान याने १९७७ मध्ये जेकेएलएफची स्थापना केली होती. जेकेएलएफने खानच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले असून आमच्या संघर्षातील ही अपरीमित हानी असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)काश्मीरबाबत पाकिस्तानच्या अधिकृत धोरणाचे पालन करण्यास अमानुल्ला खानने नकार दिल्यामुळे त्याच्याबद्दल पाकिस्तानचे चांगले मत नव्हते. खान याचा जन्म काश्मीरच्या गिलगिट भागात झाला होता. सध्या गिलगिट-बाल्टिस्तान म्हणून हा भाग ओळखला जातो. खान याच्या पश्चात अस्मा ही एकमेव मुलगी असून तिचा फुटीरवादी काश्मिरी नेता सज्जाद गनी लोन याच्याशी विवाह झाला आहे. ——————
जेकेएलएफ नेता अमानुल्लाचे निधन
By admin | Published: April 27, 2016 4:50 AM