ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २१ - युरोपमधील ब्रिस्टल येथील कॉल सेंटरमध्ये काम करणा-या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीला किस केल्याने ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
युरोपमधील डेलीमेल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार मार्टिन सिंग हे ब्रिस्टल येथील आरएसी नामक कॉल सेंटरमध्ये कामाला होते. काही दिवसांपूर्वीच मार्टिन यांची पत्नी रुबी यांनाही त्याच कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली होती. चार मुलं झाल्यावर रुबी पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याने सिंग कुटुंबीय आनंदात होते. पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी सिंग यांनी ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केले. मात्र हा किस सिंग यांना भलताच महागात पडला आहे. सिंग यांना कामावरुन काढून टाकण्यात आले असून किस केल्यामुळे कंपनीने कामावरुन काढल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. मी याची माहिती माझ्या सहका-यांना दिली असता त्यांनादेखील धक्का बसला असे सिंग यांनी म्हटले आहे. कामावर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून कंपनीच्या वरिष्ठांकडून माझा छळ होत होता असा गंभीर आरोपही सिंग यांनी केला. आता माझी पत्नी रुबी कामावर जात असली तरी या घटनेमुळे ती निराश झाल्याचे सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, आरएसी कंपनीतील अधिका-यांनी सिंग यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मार्टिन सिंग हे दोन महिन्यापूर्वीच एका एजन्सी मार्फत आमच्या कंपनीत लागले होते. कामाच्या वेळेत स्वतःचा मोबाईल वापरणे, ऑनलाइन व्हिडीओ बघणे, ड्रेसकोडचे उल्लंघन करणे या कारणांवरुन त्यांना कामावरुन काढल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.