वॉशिंग्टन : अमेरिकेत नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोघेही आपापल्या पक्षांचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.
बायडेन आणि ट्रम्प यांना पक्षाच्या प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प यांना १,२१५ मतांची गरज होती. त्यांना १२२८ मते मिळाली. त्याच वेळी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी बायडेन यांना एकूण १९६९ मतांची आवश्यकता होती. त्यांना २१०७ मते मिळाली.
६ जानेवारी २०२१ राेजी झालेल्या निवडणुकीत बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला हाेता. त्यावेळी ट्रम्प यांनी निवडणुकीत फेरफार झाल्याचा आराेप केला हाेता. ट्रम्प यांचे हजाराे समर्थक अमेरिकेच्या संसदेवर चालून गेले हाेते. याप्रकरणी अनेकांना अटक केली हाेती. (वृत्तसंस्था)
निक्की हेली यांचा पराभव
- राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या निक्की हेली यांचा पराभव केला. १५ राज्यांमध्ये झालेल्या मतदानात १४ जागांवर ट्रम्प यांचा विजय झाला.
- तर हेली यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. त्यानंतर त्यांनी दावेदरी मागे घेतली. तर, बायडेन यांचा सर्व १५ राज्यांमध्ये विजय झाला.
दाेन अनिवासी भारतीय शर्यतीतून बाहेर
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत दाेन भारतीय वंशाचे नागरिक हाेते. निक्की हेली आणि विवेक रामास्वामी यांनी दावा केला हाेता. मात्र, प्रारंभिक निवडणुकीत रामास्वामी यांचा पराभव झाला. त्यानंतर हेली यांचा अंतिम टप्प्यात पराभव झाला.
आम्ही निवडीचे स्वातंत्र्य बहाल करू : बायडेन
‘आम्ही लोकशाहीचे रक्षण करू. इतरांना देश तोडू देऊ नका. आम्ही निवडण्याचा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा अधिकार बहाल करूत. अतिरेकी हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी व्यक्त केली आहे.
मी जिंकलो तर तुरुंगातील समर्थकांना सोडेन : ट्रम्प
उमेदवार म्हणून निवडून येण्याच्या एक दिवस अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास संसदेवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या त्यांच्या सर्व समर्थकांची सुटका करण्यात येईल, असे म्हटले होते.