लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदाची सूत्रे सांभाळणारा त्याचा अत्यंत खास सहकारी अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याची घोषणा केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जवाहिरी हा काबुलमध्ये होता. तालिबानची सत्ता असल्याने तिथे अमेरिकी सैनिक जमिनीवर उतरून कारवाई करू शकत नव्हते. जवाहिरी काबुलमध्ये असणे हे कराराचे तालिबानने केलेले उल्लंघन असल्याचा आरोप बायडेन यांनी केला आहे.
लादेननंतर अल जवाहिरीने अल कायदाची सूत्रे हाती घेतली होती. तोच दहशतवादी कारवायांना पुढे नेत होता. हा दहशतवादी नेता आता राहिला नाही, असे बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या सायंकाळच्या भाषणात जाहीर केले.
तत्पूर्वी अमेरिकेने काबुलमधील काही ठिकाणांवर ड्रोन हल्ले केल्याचे तालिबानने रविवारी वृत्त फेटाळले होते. याचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. तरी देखील तालिबान नाही म्हणत होता. आता अमेरिकेनेच स्पष्ट केले आहे.