वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी मंगळवारी अफगाणिस्तान संकटावर (Afghanistan Crisis) अमेरिकेला संबोधित केले. यावेळी तालिबानचा (Taliban) ताबा आणि अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीबाबत जो बायडन यांनी अशरफ गनी (Ashraf Ghani) यांच्यावर निशाणा साधला आहे. अफगाणिस्तामधील सध्याच्या स्थितीला अशरफ गनी जबाबदार आहेत. अशरफ गनी यांनी आपल्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभे रहायला हवे होते. मात्र ते न लढताच रणांगण सोडून पळून गेले. त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की, न लढता अफगाणिस्तानातून का पळून गेला? असे जो बायडन म्हणाले.
मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षांनी अतिशय कठीण निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासाठी चांगली वेळ कधीच नव्हती. आम्ही मोठी जोखीम उचलली. त्यानुसार आम्ही सैन्य माघारी केली. पण यानंतर तालिबान पुन्हा अफगाणिस्तावर कब्जा करेल, याचा अंदाज आम्हाला होता. पण इतक्या वेगाने तालिबान ताबा मिळवेल असे वाटले नव्हते, असे जो बायडन यांनी सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावल्यानंतर तालिबानने ज्या प्रकारे तिथे पुन्हा कब्जा केला. त्यावरून अमेरिका आणि जो बायडन यांच्यावर टीका होत आहे. यावर जो बायडन यांनी आपली भूमिका मांडली.
अफगानिस्तानमधील नेत्यांवर आरोपयाचबरोबर, सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत येथील नेत्यांवर जो बायडन यांनी आरोप केले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे नेते तेथील लोकांच्या फायद्यासाठी एकत्र येऊ शकले नाहीत. आपल्या देशाच्या भवितव्यासाठी तो तडजोड करू शकले नाहीत. अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली नसती तर आपण असे कधीच केले नसते, असे जो बायडन म्हणाले. तसेच, आमचे प्रतिस्पर्धी चीन आणि रशिया यांना वाटत होते की, अमेरिकेने अफगाणिस्तानात लाखो डॉलर्स वायफळ खर्च करावेत, असे जो बायडन म्हणाले.
परिस्थितीवर बारकाईने लक्ष आमच्या सैनिकांवर हल्ला झाला तर कठोर आणि वेगवान कारवाई करू, असे आम्ही तालिबानला स्पष्टपणे सांगितले आहे. अमेरिकेचे सैनिक तिथून जात आहेत. पण आम्ही तेथील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अफगाणिस्तानला पुढे नेण्याची आमची इच्छा आहे. अलिकडच्या काळात आमच्याकडून अनेक चुका झाल्या. आता अफगाणिस्तामधील स्थिती गंभीर झाली आहे. यासाठी संपूर्ण जगाने मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असं आवाहन जो बायडन यांनी केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाना साधला. ते म्हणाले की, १ मे च्या अंतिम मुदतीबाबत आमच्या करारानंतरही अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेण्याची चांगली वेळ आली नाही. परिस्थिती काहीही झाली, ती अचानक झाली आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने गुडघे टेकले, अफगाण नेते देश सोडून पळून गेले.आम्ही स्पष्ट हेतूने अफगाणिस्तानला गेलो. आम्ही अल कायदाचा खात्मा केला. आमचे ध्येय 'राष्ट्र निर्माण'चे नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अफगाणिस्तानमध्ये १५ हजाराहून अधिक अमेरिकेचे सैनिक होते. आमचे सरकार आल्यावर फक्त २ हजार सैनिक राहिले होते. आता अफगाणिस्तानमध्ये आमचे ६ हजार सैनिक आहेत. जे काबुल विमानतळाची सुरक्षा करत आहेत, असे जो बायडन म्हणाले.