अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाताजाता पोटच्या मुलाचे गंभीर गुन्हे माफ केले आहेत. अवैधरित्या बंदूक ठेवणे आणि कर चोरीच्या गुन्ह्यातून आपल्या मुलाला दोषमुक्त केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेसारख्या देशात अशाप्रकारे मुलाला सोडविण्यासाठी पदाचा गैरवापर राष्ट्राध्यक्षांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
हे तेच बायडेन आहेत ज्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होताना आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपल्या शक्तींचा वापर न करण्याचे आश्वासन अमेरिकी जनतेला दिले होते. आज बायडेन यांनी एक पत्र जारी करून मी माझा मुलगा हंटरला माफी दिली आहे, हे जाहीर केले आहे.
मी राष्ट्राध्यक्ष पद घेतले तेव्हा सांगितलेले की न्याय विभागाच्या निर्णयांत दखल देणार नाही, हे आश्वासन मी पाळले देखील आहे. मात्र मी असे पाहिले की माझ्या मुलाला लक्ष्य केले जात आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकविले जात आहे. त्याच्यावर लावलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरीत होते. जो कोणी समजूतदार व्यक्ती हंटरच्या केसबाबत माहिती ठेवत असेल त्याला हंटरला कसे मुद्दामहून लक्ष्य केले गेले हे नक्कीच समजेल. मला वाटते की एक वडील आणि राष्ट्रपतींनी हा निर्णय का घेतला असेल हे अमेरिकी नागरीक समजून घेतील, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
मुलाविरोधात डेलावेअर आणि कॅलिफोर्नियात सुरु असलेल्या खटल्यांत आपण लक्ष घालणार नाही किंवा त्याला माफी देणार नाही असे बायडेन यांनी स्पष्ट केले होते. तरीही आता जाताजाता बायडेन यांचे पुत्रप्रेम जागे झाले आहे. हंटर याच्यावर कर चोरी, बेकायदा शस्त्र बाळगने, सरकारी पैशांचा चुकीचा वापर करणे व खोटी साक्ष देणे असे गंभीर गुन्हे दाखल होते. डेलावेअरच्या कोर्टाच त्यानेच कर चोरी आणि शस्त्र बाळगल्याचे कबुल केले होते. २०१७, २०१८ या दोन वर्षांचा कर हंटरने मुद्दामहून भरला नव्हता. हा कर १ लाख डॉलरपेक्षा अधिक आहे.
हंटर हा चेन स्मोकरही होता. पेशाने इन्व्हेस्टमेंट बँकर आणि आर्टिस्ट असून बायडेन यांच्या वकील आणि परदेशी कंपन्यांना सल्ला देण्याचे काम करतो.