अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी रात्री पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीला संबोधित करत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागून गेली. त्यामुळे त्यांच्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. मात्र, सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांची घटनास्थळावरून सुखरूप सुटका केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा जवानांनी हल्लेखोराला ठार केलं. रॅलीला आलेल्या लोकांपैकी एका सदस्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "मला पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. तो सुरक्षित आहेत हे जाणून मला आनंद झाला. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि रॅलीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे. जिल आणि मी ट्रम्प यांना सुरक्षितपणे एस्कॉर्ट केल्याबद्दल सीक्रेट सर्व्हिसचे आभारी आहोत. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. याचा निषेध करण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून संघटित झालं पाहिजे" असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, "मला पेनसिल्व्हेनियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही हे जाणून आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि या गोळीबारात जखमी झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. अशा प्रकारच्या हिंसाचाराला आपल्या देशात स्थान नाही. आपण सर्वांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध केला पाहिजे आणि या घटनेमुळे आणखी हिंसाचार होणार नाही याची खात्री करण्यासाठी आपली भूमिका बजावली पाहिजे."
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील याबाबच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. "आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसाचाराला अजिबात स्थान नाही. आम्हाला अद्याप नेमकं काय झालं हे माहीत नाही. पण माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झाली नसल्याने दिलासा मिळाला आहे. मिशेल आणि मी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहोत" असं बराक ओबामा यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे २०१६ ते २०२० पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये त्यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत त्यांनी सांगितले की, त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली. ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या निवेदनात ट्रम्प यांनी त्यांचा जीव वाचवल्याबद्दल यूएस सीक्रेट सर्व्हिसचे आभार मानले आहेत.