युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर बायडेन भडकले; एका 'थँक्यू'वरून मोठे नाराजीनाट्य घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:04 PM2022-11-01T12:04:41+5:302022-11-01T12:05:14+5:30
बायडेन आणि झेलेन्स्की यांच्यातील हा फोन कॉल खूप तनावपूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका युक्रेनला एवढी मदत करत आहे, तरी झेलेन्स्कींनी साधे थँक्यूसुद्धा बोलू नये, यावरून बायडेन नाराज झाले.
रशिया आणि युक्रेन युद्धाला आठ महिने झाले आहेत. याकाळात युक्रेनला अमेरिकेसह युरोपीय देशांनी मोठी मदत केली आहे. पैसे, धान्य आणि रशियासोबत लढण्यासाठी शस्त्रास्त्रे देण्यात आली. अमेरिकेने युक्रेनला सर्वात मोठी आणि अनेकदा मदत केली आहे. असे असताना युक्रेनी अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी साधे थँक्यूसुद्धा म्हटले नाही, याचा राग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आला आणि ते फोनवरच भडकल्याचे समोर आले आहे.
युक्रेनला शस्त्रास्त्रे, पैशांची मदत हवी असते. एकदा तर झेलेन्स्की यांनी आपल्याला मदत मिळत नसल्याचा थेट आरोप आंतरराष्ट्रीय नेत्यांवर केला होता. एनबीसी न्यूजनुसार बायडेन आणि झेलेन्स्की यांच्यात १५ जूनला फोनवर चर्चा झाली. या चर्चेत बायडेन यांनी अमेरिका आणखी १ अब्ज डॉलर्सची मदत देत असल्याचे झेलेन्स्कींना सांगितले. यावर झेलेन्स्की यांनी कोरडे ओके, म्हणत आपल्याला आणखी मदत हवी, आणखी मदत हवीय असा पाढा वाचायला सुरुवात केली. यावर बायडेन यांचा पारा चढला.
बायडेन आणि झेलेन्स्की यांच्यातील हा फोन कॉल खूप तनावपूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका युक्रेनला एवढी मदत करत आहे, तरी झेलेन्स्कींनी साधे थँक्यूसुद्धा बोलू नये, यावरून बायडेन नाराज झाले. त्यांनी मोठ्या आवाजात चिडून आम्ही आधीपासूनच खूप उदार आहोत, असे झेलेन्स्की यांना सांगितले.
यानंतर झेलेन्स्कींच्या काय चुकलेय ते लक्षात आले. त्यांनी फोन ठेवल्यानंतर तातडीने एक व्हिडीओ जारी करत अमेरिकेला मदतीसाठी थँक्यू म्हटले. दुसरीकडे बायडेन यांच्या अधिकाऱ्यांनी असे काही घडल्याचे नाकारले आहे. बाय़डेन यांनी झेलेन्स्कींशी स्प्ष्ट आणि शांतपणे चर्चा केल्याचे म्हटले आहे. दोन्ही राष्ट्राध्यक्षांदरम्यान संबंध चांगले असल्याचे सांगितले जात असले तरी अमेरिकेत आता युक्रेनला एवढी मोठी मदत देण्यावरून वाद सुरु झाला आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक खासदारांचा विरोध होऊ लागला आहे.