वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल होते. आता, या निवडणुकीत जो बायडन यांनी विजय मिळवला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्विकारणार आहेत. सीएनएनने जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीचे वृत्त दिले आहे.
जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. मात्र, आता या निवडणुकीचा निकाल लागला आहे. जो बायडन यांनी 270 चा मॅजिक फिगर पार केला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याचे दिसून येते.
दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. मात्र, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे दिसून येते होती. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवानाही झाल्या आहेत. आता, बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे, उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची वर्णी लागणार आहे.