Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी बांधलेल्या मोठमोठ्या इमारती इस्रायलच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायली सैन्य अजूनही हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी प्रथमच आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्धानंतर अंतरिम कालावधीसाठी गाझा पट्टीची सुरक्षा व्यवस्थापित करण्यात मदत करण्याचे आवाहन केले. वॉशिंग्टन पोस्टच्या ऑप-एडमध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर हल्ले करणार्या हिंसक इस्रायली वसाहतींना प्रवेश बंद करण्याची धमकी दिली. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषद घेताना पॅलेस्टिनी प्राधिकरण म्हणजेच PA सध्याच्या स्वरूपात गाझा पट्टीवर राज्य करण्यास योग्य नाही, असे सांगितले.
पीएचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. बायडेनने आपल्या लेखात लिहिले की, संकटानंतर लगेचच, आंतरराष्ट्रीय समुदायाने गाझाला मदत करण्यासाठी अंतरिम सुरक्षा उपायांसह संसाधनांची व्यवस्था करण्यास वचनबद्ध केले पाहिजे. गाझाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुनर्निर्माण यंत्रणा स्थापन करावी, असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. यासोबतच, गाझा किंवा वेस्ट बँकमधून पुन्हा कधीही दहशतवादी धोका निर्माण होणार नाही हे ठरवावे लागेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जो बायडेन यांचा प्रस्ताव जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनीही फेटाळला. त्यांनी मनफा सुरक्षा मंचला सांगितले की युद्धानंतर कोणतेही अरब सैन्य गाझामध्ये तैनात केले जाणार नाही कारण जेरुसलेमशी अम्मानचे संबंध बिघडलेले आहेत.