वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर १५ अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिकेचे तोडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा, हवामान बदल या विषयावरील पॅरिस करारात पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय बायडेन यांनी घेतला तसेच अमेरिकेत येण्यास मुस्लिमांना असलेली बंदीही उठविण्यात आली.माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे. मॅक्सिकोच्या सीमेवर सुरू असलेले कुंपणभिंतीचे कामही तत्काळ थांबविण्यात आले आहे. ट्रम्प यांनी वंशद्वेषी भूमिकेतून जे निर्णय घेतले होते तेही बायडेन नजीकच्या काळात बदलणार आहेत. ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या जनतेला मी जी वचने दिली आहे ती पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करेन. मी घेतलेले पहिले १५ निर्णय महत्त्वाचे असले तरी अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. अजून काही गोष्टींबाबत पावले उचलायची आहेत.
...असे आहेत पंधरा निर्णय -१) अमेरिकी संघराज्याच्या मालकीच्या सर्व जागांमध्ये नागरिकांनी मास्क परिधान करावा व फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.२) आगामी १०० दिवस अमेरिकी जनतेने मास्क परिधान करावा.३) जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सामील होणार४) कोरोना साथीच्या स्थितीबाबत उपाययोजनेसाठी समन्वयकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य सुरक्षा हा विभाग कायम ठेवण्यात येणार आहे.५) कोणत्याही कारणाने बेदखल करणे किंवा त्यासंबंधी इतर कारवाई करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.६) मॅक्सिकोच्या सीमेवर सुरू असलेले कुंपणभिंतीचे कामही तत्काळ थांबविण्यात आले आहे.७) हवामान बदल या विषयावरील पॅरिस करारात अमेरिका पुन्हा सहभागी होईल.८) मुस्लिमांना अमेरिकेत येण्यावर घातलेली बंदी उठविण्यात आली आहे.९) अमेरिकी विद्यार्थ्यांनी कर्ज परतफेड करण्यावरील स्थगितीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.१०) वंशद्वेषाला बाजूला सारून तसेच समानता राखून यापुढे सर्व निर्णय घेण्यात येतील.११) सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील.१२) ज्या स्थलांतरितांकडे वैध कागदपत्रे नाहीत त्यांना जनगणनेतून वगळण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.१३) जे लहानपणीच अमेरिकेत अवैधरीत्या आले त्यांना कोणतेही संरक्षण न देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय बदलण्यात आला आहे.१४) स्थलांतरितांविषयी ट्रम्प सरकारने खूप कडक धोरणे आखली होती. आता बायडेन सरकारच्या धोरणाप्रमाणे त्यात बदल केले जातील.१५) ट्रम्प यांनी विविध खात्यांतील नियंत्रकांच्या कामकाजाचा आढावा घेण्याची जी पद्धत अंमलात आणली होती ती बदलण्याचे बायडेन सरकारने ठरविले आहे.अमेरिकेच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्रांकडून स्वागत -जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिकेने पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घेतलेल्या या भूमिकेचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी स्वागत केले आहे. कोरोना साथीच्या काळात परस्पर सहकार्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, असे ते म्हणाले.
बायडेन यांच्याकडून भाजपने धडा घ्यावा : चिदंबरम अमेरिकेत जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची शपथ घेतली असताना काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजपला सल्ला दिला आहे की, त्यांच्याकडून विविधता आणि बहुतत्त्ववाद यांचा धडा घ्यायला हवा. बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष झाले आहेत. देशातील विभाजन समाप्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.ट्रम्प यांनी बायडेन यांना लिहिले हृदयस्पर्शी पत्र -अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना त्या पदावरून पायउतार झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. मात्र त्या पत्रात ट्रम्प यांनी काय लिहिले आहे याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.