बर्लिन : जेरुसलेम आणि टेम्पल आॅफ माऊंट परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट जॉन केरी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची बर्लिन येथे भेट घेतली. या आठवड्याच्या शेवटी केरी पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना जॉर्डनमध्ये भेटणार आहेत. बर्लिन दौऱ्यावर आलेल्या नेतान्याहू यांनी काल जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांची भेट घेतली.केरी यांनी नेत्यानाहू यांच्यासह झालेल्या बैठकीत शह-काटशहाचे हल्ले थांबवा आणि सर्व प्रकारची हिंसा संपवा असा सल्ला दिला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनीदेखील परवा इस्रायलला अचानक भेट देऊन नेतान्याहू व अब्बास यांची भेट घेतली व दोघांनाही शांतता पाळण्याचे आवाहन केले होते. असे असले तरी इस्रायलमधील तणावाचे वातावरण अद्याप निवळलेले नाही. पॅलेस्टाईन-इस्रायल येत्या काही दिवसांमध्ये काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (वृत्तसंस्था)संशयातून हत्या पॅलेस्टाईनच्या तरुणांकडून होणारी दगडफेक तसेच चाकू मारण्याच्या वाढत्या घटनांमुळे संशयाचे वातावरण वाढीस लागले. गुरुवारी याच संशयामुळे इस्रायली सैनिकाकडूनच एका इस्रायली नागरिकाची हत्या झाली. या दोघांनाही समोरचा माणूस पॅलेस्टाईनचा हल्लेखोर आहे असे वाटल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या सैनिकाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताच त्याने झाडलेल्या गोळीत त्या नागरिकाचा मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय इरिटेरियन नागरिकाची अशाच गोंधळातून व संशयातून हत्या करण्यात आली होती. आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या चाकू हल्ल्यांमध्ये व गोळीबारामध्ये इस्रायलचे आठ तर पॅलेस्टाईनचे ४० लोक मृत्युमुखी पडले आहेत. इस्रायलने आपल्या सीमांवर मुख्य शहरांमध्ये संरक्षण व्यवस्था अधिकच कडक करून संरक्षणाची नवी नियमावली लागू केली आहे.फायनल सोल्युशन थिअरीवर टीकापॅलेस्टाईन नेत्यानेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस हिटलरला होलोकॉस्टमध्ये ज्यूंना जाळून मारण्याची (फायनल सोल्युशन) कल्पना सुचविली होतील, असे वक्तव्य बेजांमिन नेत्यानाहू यांनी बर्लिन येथे झालेल्या वर्ल्ड झिओनिस्ट काँग्रेसमध्ये केल्याने त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. पॅलेस्टाईनच्या नेत्यांनी नेत्यानाहू यांच्या या वक्तव्यावर तोंडसुख घेतलेच आहे, त्यातही इस्रायलमधील काही नेत्यांनीदेखील यावर नापसंती व्यक्त केली.
इस्रायलकडे जॉन केरी यांची शिष्टाई
By admin | Published: October 23, 2015 3:47 AM