प्रतिष्ठित समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना चकमकीत हत्या झाली आहे. दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते. माध्यमांमध्ये वृत्त झळकताच या घटनेचा निषेध व्यक्त झाल्यानंतर तालिबानने आता स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, दानिशच्या मृत्युबद्दल खेदही व्यक्त केला आहे.
अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दानिश सिद्दीक हे 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतात कोरोना या महारोगाची साथ पसरली असताना त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती. दुर्दैवाने तालिबानच्या हल्ल्यात दानिश यांचा मृत्यू झाला. याबाबत, तालिबानने स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला आहे.
तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद ने सीएनएन-न्यूज18 शी बोलताना म्हटले की, गोळीबाराच्या चकमकीत पत्रकार दानिश यांना कोणाची गोळी लागली, कशी लागली याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. दानिश यांच्या मृत्युचा आम्हाला खेद वाटतो, असेही मुजाहिद यांनी म्हटले आहे. तसेच, तालिबानमध्ये कव्हरेजसाठी येणाऱ्या इतर पत्रकारांना सल्लाही देण्यात आला आहे. युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पत्रकारांनी आम्हाला सूचना देणे आवश्यक आहे. तसे केल्यास त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे सहज शक्य होईल. मात्र, पत्रकार आम्हाला सूचना न देताच युद्धभूमीत प्रवेश करत आहेत, या गोष्टीचा आम्हाला खेद आहे, असेही तालिबानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानचे राजदूत फरीद, ममुंडजे यांनी ट्विटरवरुन दानिशच्या मृत्यूसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला. “काल रात्री कंदाहार येथे मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या दु: खद बातमीने मनापासून दु: खी झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलासोबत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला ”असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.