ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १२ - मुलीच्या प्रेमविवाहाला पाठिंबा दिला म्हणून पाकिस्तानात एका पत्रकाराची गोळया झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अजमल जोईया असे मृत पत्रकाराचे नाव आहे. दुचाकीवरुन घरी परतत असताना तिघांनी अजमल यांची गोळया झाडून हत्या केली. सोमवारी ही घटना घडली.
अजमल यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी चुलतभाऊही त्यांच्यासोबत होता. तो जखमी झाला असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. अजमल यांच्या ओळखीच्या एका मुलीने घरच्यांना न जुमानता तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न केले होते. अजमल यांनी या लग्नाला पाठिंबा दिला होता. या नवविवाहीत दांम्पत्याला सुरक्षा देण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाशीही चर्चा केली होती.
त्याच राग मुलीच्या कुटुंबियांना होता. म्हणून त्यांनी अजमल यांची हत्या केली. पोलिसांनी एका मारेक-याला अटक केली असून, दोघे अजून फरार आहेत. पंजाबमधील विविध शहरात पत्रकारांच्या विविध संघटनांनी अजमल यांच्या हत्येच्या विरोधात निदर्शने केली आहेत.
मारेक-यांना अटक करण्याबरोबर जोईया कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. हॉनर किलिंगच्या घटना पाकिस्तानात सामन्य असून, अशा प्रकरणात बहुतेकदा मुलीची हत्या केली जाते त्याचबरोबर जे अशा विवाहांना पाठिंबा देतात त्यांना सुद्धा लक्ष्य केले जाते.
मागच्या महिन्यात अबोटाबादमध्ये मैत्रीणीला लग्नासाठी घरातून पळून जायला मदत केली म्हणून एका तरुणीची हत्या करुन नंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला होता.