बीजिंग- चीनमध्ये वृत्तपत्रात बुधवारी यंत्रमानव पत्रकाराने (रोबोट जर्नलिस्ट) अवघ्या एका सेकंदात ३०० वर्ण अक्षरांचा (कॅरेक्टर्स) लेख लिहून पत्रकारितेला प्रारंभ केला. या लेखाचा विषय हा वसंत ऋतुतील सणानिमित्त होणाऱ्या प्रवासाची धावपळ असा होता, असे वैज्ञानिकांनी सांगितले.या यंत्रमानव पत्रकाराचे नाव शिओ नान असून तो लेख लिहिण्याचे काम फक्त सेकंदात पूर्ण करतो. तो छोट्या आणि दीर्घ बातम्याही लिहतो, असे पेकिंग विद्यापीठातील प्रोफेसर वॅन शिओजुन यांनी सांगितले. शिओजुन अशा प्रकारच्या यंत्रमानवाचा अभ्यास करून त्याला विकसित करणाऱ्या तुकडीचे प्रमुख होते.या वृत्तपत्रातील इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शिओ नान याची माहितीचे विश्लेषण करण्याची व अतिशय वेगाने बातम्या लिहिण्याची क्षमता खूपच असल्याचे ते म्हणाले. याचा अर्थ असा नाही की अतिशय बुद्धीमान यंत्रमानव पत्रकार सगळ््या बातमीदारांची जागा घेतील, असे शिओजुन यांनी म्हटल्याचे ‘चायना डेली’ने वृत्त दिले. सध्या हे यंत्रमानव पत्रकार समोरासमोर मुलाखत घेऊ शकत नाहीत, प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाहीत आणि त्यांच्याकडे मुलाखत किंवा संभाषणातून बातमी कोणत्या मुद्यावर द्यावी याची क्षमता नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु हे यंत्रमानव पूरक भूमिका बजावू शकतील, वृत्तपत्रांना व संबंधित माध्यमांना, संपादकांना व बातमीदारांना मदतनीस म्हणून उपयुक्त ठरतील, असेही शिओजुन म्हणाले.
यंत्रमानव पत्रकाराने सेकंदात लिहिला वृत्तलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 5:08 AM