ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.12- जुलै महिन्यामध्ये होत असलेल्या 20 व्या ज्युईश मक्काबिया ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये भेट घेणार आहेत. 4 जुलै ते 18 जुलै या काळात जगभरातील विविध देशांमधील ज्यू धर्मिय खेळाडू या ऑलिम्पिक्समध्ये सहभाग घेणार आहेत. भारतीय ज्यू समुदायाचेही खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत. या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जुलै रोजी भेटणार आहेत. मक्काबिया ऑलिम्पिक्स नावाने ओळखले जाणारे हे खेळ दर 4 वर्षांनी इस्रायलमध्ये भरवले जातात. मक्काबियन याचा अर्थ एकत्र येणे असा होतो. 2009 साली भारतीय क्रिकेट संघाला या खेळात रौप्य पदक तर बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक मिळाले होते. यावर्षीही बॅडमिंटन, क्रिकेट आणि पोहणे या क्रीडा प्रकारामध्ये भारतीय ज्युईश खेळाडू सहभागी होत आहेत. 1992 साली भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनैतिक संबंध स्थापित होण्याला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या भेटीवर जात आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेल अविवमध्ये भारतीय खेळाडू आणि इस्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय ज्यू समुदायाचीही ते भेट घेतील. इस्रायलच्या क्रिकेट संघात 80 टक्के भारतीयच- सॅम मार्शल, अध्यक्ष भारतीय ज्यू प्रतिनिधी मंडळ मक्काबियन ऑलिम्पिक्स ही जगातील सर्व ज्युईश समुदायाला एकत्र येण्याची उत्तम संधी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आम्ही ज्युईश बांधव मोदी कुर्ता घालून करणार आहोत. इस्रायलमध्ये आज 70 हजार भारतीय वंशाचे ज्यू राहतात. इस्रायलच्या क्रिकेट संघामध्येही 80 टक्के भारतीय वंशाचेच ज्यू आहेत. त्यामुळे हे खेळ एकप्रकारे आपल्याच बांधवांना एकत्र आणणारे असतात. आम्ही पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी इस्रायलमधील भारतीय राजदुतांशी संपर्क करुन वेळ निश्चित केली आहे. या खेळांसाठी लागणाऱ्या निधीसाठी आम्ही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचीही मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन देशांमधील संबंध वृद्धिंगत होतील- एजरा मोझेस, उपाध्यक्ष, भारतीय ज्यू प्रतिनिधी मंडळ भारत आणि इस्रायलमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही देशांत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. संरक्षण, शेती, जलव्यवस्थापन, तंत्त्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये हे आदानप्रधान होत असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात लहान लोकशाही यांचा हा मिलाफ आहे. आता क्रीडास्पर्धांमुळेही दोन्ही देशातील संबंध वाढीस लागतील अशी आम्हाला आशा आहे.