ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - आपण किती वर्ष जगणार आहोत आपल्यालाही माहित नसतं. पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत काय करायचं आहे याची एक यादी आपण सर्वांनीच नक्की तयार करुन ठेवली असते. त्या इच्छा मृत्यूपुर्वी पुर्ण व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण ते शक्य होईलच की नाही याची शाश्वती नसते. पण जेव्हा तुम्ही 100 वर्षाहून जास्त काळ जगता तेव्हा मात्र जर तुमची इच्छा पुर्ण झाली नसेल तर मग तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे. अशीच एक इच्छा आजीबाईंनी पोलिसांसमोर ठेवली आणि पोलिसही बुचकळ्यात पडले. कारण मला अटक व्हावी अशी त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे आजीबाईंनी काही गुन्हाही केला नव्हता.
एडी सिम्स असं या आजीबाईंचं नाव असून त्यांचं वय 102 वर्ष आहे. आपल्याला पोलिसांनी कधीतरी अटक करावी अशी त्यांची इच्छा होती. पण आजपर्यंत त्यांच्यावर कधीच अटक होण्याची वेळ आली नव्हती. म्हणून मग आपली इच्छा पुर्ण होण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे ती व्यक्तीही केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी फक्त त्यांची इच्छा पुर्ण व्हावी यासाठी त्यांना अटकही केली. त्यांच्या हातात बेड्या टाकून पोलिसांच्या गाडीतून त्यांना नेण्यात आलं.
एडी सिम्स यांना हातात बेड्या पडल्याचा खूप आनंद झाला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्यांचं स्वप्न पुर्ण करत आदराने सेंट लूईस फाईव्ह स्टार सिनिअर सेंटरमध्ये सोडलं. त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवूनही नेण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा मला खूप बरं वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.