तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लाखो लोक देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी राजधानी काबुलमधील विमानतळावर तीन स्फोट झाले. काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात अनेकांनी आपला जीव गमावलाय. मीडिया रिपोर्टनुसार, काबूल विमानतळावरील स्फोटातील मृतांचा आकडा 100 च्या पुढे गेला असून, यात 13 अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. याच दरम्यान काबुलमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. बायडन यांच्या सुरक्षा टीमने धोक्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, काबुलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि अफगाणिस्तानच्या राजधानीतील काबूल विमानतळावर सर्वोच्च सुरक्षा उपाय करण्यात येत आहेत. या मिशनचे पुढील काही दिवस हे आतापर्यंतचा सर्वात धोकादायक असा काळ असेल. बायडन यांनी सिच्युएशन रूममध्ये आपल्या राष्ट्रीय सुरक्षा दलाची भेट घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांवी त्यांना याबाबत महत्त्वाची माहिती दिली. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamla Harris) देखील व्हिडीओ टेलिकॉन्फरन्सद्वारे यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या अमेरिकन आणि अफगाणिस्तानांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशनचे पुढील काही दिवस हे आतापर्यंतचे सर्वात धोकादायक दिवस असतील. अमेरिकन सैन्य दर काही तासांनी हजारो लोकांना एअरलिफ्ट करत आहे. गुरुवारी दोन आत्मघाती हल्लेखोर आणि बंदूकधाऱ्यांनी काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. त्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 100 हून अधिक लोक ठार झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खुरासर प्रोविंस (IS_KP) नं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून, या संघटनेच्या प्रमुखासंबंधी एक मोठा खुलासा झाला आहे. इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (IS-KP) प्रमुख मावलावी अब्दुल्ला उर्फ अस्लम फारुकी याच्या आदेशावरुनचा हा हल्ला करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम फारुकीचे यापूर्वी लष्कर-ए-तैयबाशी संबंध होते. यानेच हक्कानी नेटवर्कच्या साथीनं काबुल आणि जलालाबादममध्ये अनेक हल्ले घडवून आणले आहेत. फारुकीचा तहरीक-ए-तालिबानपाकिस्तानशीही संबंध असल्याची माहिती आहे.