काबुल - अफगाणिस्तानमधील विदाराक परिस्थितीमुळे तेथील नागरिक देश सोडून विदेशात आपलं बस्तान बसवत आहेत. अफगाणिस्तानवरतालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीतील फोटो व्हायरल झाले. तर, आता अफगाणिस्तानमधील चित्रपट दिग्दर्शक महिलेची भावूक पोस्ट व्हायरल झाली आहे. फोटोग्राफर असलेल्या रोया हैदरी यांनी अफगाणिस्तान सोडतानाचे भावनिक क्षण शब्दात उतरवले आहेत.
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अंधाधुंदी माजली आहे. अनेकजण देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर धाव घेत आहे. राष्ट्रपती अश्रफ घानी हेसुद्धा काबुल सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रयाला गेले आहेत. आता, रोया हैदरी यांच्या पोस्टनेही सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, तालिबान अन् अफगाणिस्तानमधील परिस्थितीही निदर्शनास येत आहे. मी माझं आयुष्य सोडून येत आहे. पुन्हा एकदा मी माझ्या देशातून पळून आलेय. मी पुन्हा शुन्यातून सुरूवात करेन. केवळ एक कॅमेरा आणि मृत आत्मा घेऊन मी समुद्र पार करुन आलेय. अतिशय जड अंत:करणाने मी माझ्या देशाला गुडबाय करून आलेय, अशी भावनिक पोस्ट रोया हैदरी यांनी लिहिली आहे. रोया यांच्या पोस्टवर अनेकांना कमेंट केल्या आहेत. तर, सोशल मीडियावरही ही पोस्ट व्हायरल होत आहे.
माजी मंत्र्यांवर पिझ्झा विकायची वेळ
EHA News ने काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंनुसार अफगाणिस्तानचे माजी मंत्री अहमद शाह जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करताना दिसत आहेत. अहमद हे तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा ते मंत्री नव्हते. तर त्यांना वर्षभरापूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तालिबानच्या दहशतीमुळे त्यांना देश सोडून पलायन करावे लागले. आता अफगाणिस्तानचे माजी मंत्री असलेले सय्यद अहमद शाह हे जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनले आहेत. ते जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करून उदरनिर्वाह करत आहेत.