काबुल: काबुल विमानतळावर अचानक जवळपास 20 ते 30 रॉकेटने हल्ला झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली आहे. अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं असून विमानतळ खाली करण्यात आलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस हे आजच काबुलमध्ये दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत दौरा संपवून आजच मॅटिस अफगाणिस्तानमध्ये पोहोचले आणि हा हल्ला झाला आहे.
स्थानिक मीडिया एजन्सी टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळाजवळ 20 ते 30 रॉकेट पडल्याचं स्थानिक नागरिकांनी पाहिलं. मॅटिस विमानतळावर पोहोचल्याच्या थोड्यावेळानंतरच रॉकेट पडताना स्थानिकांनी पाहिलं. विमानतळाजवळ नाटोचं(NATO) बेस कॅम्प आहे. त्यामुळे नाटोचं बेस कॅम्प हेच रॉकेटचं लक्ष्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक वृत्तानुसार, सुदैवाने या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण रॉकेट हल्ला झाल्याचं वृत्त आल्यानंतर लगेचच विमानांची उड्डाणं बंद करण्यात आली आणि विमानतळ खाली करण्यात आलं.