यंगून : उत्तर म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाच्या युवकांनी बुधवारी पहाटे एका पोलीस चौकीवर हल्ला केला. असे प्रकार वाढीस लागल्यामुळे देशातील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.म्यानमारमध्ये लष्करी सत्तांतराला प्रखर विरोध करणारे आंदोलक व सुरक्षा दलांमधील संघर्षात काचिन समुदायाची महत्त्वाची भूमिका असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, काचिन इंडिपेन्डन्स आर्मीने काचिन राज्यातील श्वेगू शहरात बुधवारी पहाटे एका पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला. यावेळी हल्लेखोरांनी एका पोलीस अधिकाऱ्याला जखमी केले असल्याचे समजते.यापूर्वी शनिवारी म्यानमारच्या कारेन गुरिल्लाच्या सदस्यांनी लष्कराच्या एका चौकीवर हल्ला करून कब्जा मिळविला होता. यानंतर लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात १० जण ठार झाले होते व हजारो लोक सीमा ओलांडून थायलंडमध्ये पळून गेले होते.कारेन नॅशनल युनियनने (केएनयू) हवाई हल्ल्यांबाबत निवेदन जारी करून म्हटले आहे की, म्यानमारचे सैनिक सर्व मोर्चांवर आमच्या भागात पुढे सरकत आहेत व आम्ही याचे चोख प्रत्युत्तर देत आहोत. केएनयू कारेन अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी मुख्य राजकीय आघाडी आहे. म्यानमारमध्ये जारी असलेल्या संघर्षात देशाच्या पूर्व भागात संकट वाढले आहे. कारेन समुदायाच्या सुमारे ३००० सदस्यांनी शेजारी देश थायलंडमध्ये तात्पुरता आश्रय घेतला आहे. तथापि, थायलंडच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, देशात म्यानमारमधून आलेले सुमारे २०० लोक आहेत व सीमेवरून परत जाण्याची ते तयारी करीत आहेत.
म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाचा पोलीस चौकीवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 5:51 AM