नवी दिल्ली/रिओ दी जनेरिओ : भारत आणि चीनमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा पुन्हा बहाल करणे, सीमेपलिकडील नद्यांवरील माहिती एकमेकांना देणे इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जी-२० शिखर संमेलनादरम्यान द्वीपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध सुधराविण्यावर दोघांनी सहमती दर्शविली. वर्चस्व स्थापन करण्याच्या एकांगी दृष्टीकोनाच्या विरोधात भारत आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
सैन्यमाघारी प्रक्रियेचा घेतला आढावा
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील डेमचोक, डेपसांग येथे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली होती. त्या प्रक्रियेचा जयशंकर व वांग यी यांनी आढावा घेतला.
पूर्व लडाखचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तसेच दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यासाठी भविष्यात काय पावले उचलायची, याविषयीही परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली.
त्याबाबत एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, सीमाभागातून सैन्य मागे घेण्याच्या कारवाईच्या प्रगतीबाबत मी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. तसेच भविष्यात कोणती पावले उचलायची याविषयी देखील आमचे बोलणे झाले.