जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल आठ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या महामारीत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक असून मृतांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी मंगळवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याचं टीव्हीवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आलं.
अमेरिकेत कोरोना लसीसंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याचे साईड इफेक्ट देखील समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती लस टोचून घेत आहेत. कोरोना लस टोचून घेण्यासाठी अमेरिकी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी हे करण्यात येत आहे. साउथईस्ट वॉशिंग्टनमधील मेडिकल सेंटरमध्ये कमला हॅरिस यांनी कोरोना लसीचा डोस घेतला. "मला काहीच त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित आहे. आपलं रक्षण करते आणि ती घेताना फारसं दुखतही नाही, त्यामुळे प्रत्येकाने ही लस घ्यावी असं मी आवाहन करते" असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोना व्हायरसमुळे माणसांना न्युमोथोरॅक्स (Pnumothorax) या आजाराचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या या आजारात रुग्णाची फुफ्फुसं अत्यंत कमकुवत होऊन त्याला छिद्र होऊ शकतं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यावर काहीच ठोस उपाय नसल्याने संशोधक चिंतेत आहेत.
नवं टेन्शन! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना गंभीर आजार, मृत्यूचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांच्या फुफ्फुसात फायब्रोसिस (Fibrosis) झाल्याचं दिसून येत आहे. याचाच अर्थ फुफ्फुसाच्या ज्या भागातून हवा बाहेर पडते, तिथं म्युकसचं जाळं तयार होतं. जेव्हा फायब्रोसिसमध्ये वाढ होते, तेव्हा फुफ्फुसाला छिद्र होण्यास सुरुवात होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील काही कोरोनाग्रस्तांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. हे सर्व रुग्ण 3 ते 4 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झाले होते, मात्र त्यानंतर या रुग्णांकडून आता फुफ्फुसांच्या फायब्रोसिसची तक्रार येत आहे. काही रुग्णांना यामध्ये छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या गंभीर आजारामुळे डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.