वॉशिंग्टन- भारतीय वंशाचा नागरिक श्रीनिवास कुचिभोटला याची अमेरिकेत हत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅडम प्युरिंटन असे या मारेकऱ्याचे नाव आहे. 52 वर्षे वयाच्या या गुन्हेगाराने श्रीनिवासची 22 फेब्रुवारी 2017 रोजी हत्या केली होती. यामुळे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे अशा प्रकारचे वातावरण तयार झाले होते. शुक्रवारी अॅडमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
श्रीनिवास कुचिभोटला आणि त्याचा मित्र आलोक मदासनी हे दोघे काम संपल्यानंतर कान्सास शहरातील ऑस्टीन बार येथे गेले होते तेव्हा अॅडमने तेथे येऊन त्यांच्याविरोधात वंशद्वेषी टीप्पणी करुन, आमच्या देशातून निघून जा असे सांगितले. त्यांच्यामध्ये पडणाऱ्या इयान ग्रीलॉटसुद्धा यामध्ये जखमी झाला, असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाने सांगितले. याबाबत अॅडमला जिल्हा न्यायाधीश चार्ल्स द्रिओगे यांनी अॅडमला शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना दोघांपैकी कोणाचेही कुटुंबीय उपस्थित नव्हते. कुचिभोटला आणि मदासनी हे दोघे अमेरिकेत शिकण्यासाठी गेले होते, अभियंते झाल्यानंतर ते जीपीएस तयार करमाऱ्या गार्मिन कंपनीमध्ये कार्यरत होते.