लंडन : लिंग परिवर्तनाची प्रक्रिया अर्धवट थांबविलेल्या ब्रिटनमधील एका गरोदर पुरुषाने कन्यारत्नाला जन्म दिला आहे. अशा प्रकारे लिंग परिवर्तनानंतर पुरुष झालेल्या व्यक्तीची ब्रिटनमधील ही पहिली प्रसूती आहे.२१ वर्षे वयाच्या या अनोख्या जन्मदात्याचे नाव हेडन क्रॉस असे असून, गेल्या १६ जून रोजी ग्लुसेस्टरशायर रॉयल हॉस्पिटलात सिझेरियन शस्त्रक्रियेने त्याची प्रसूती झाली.हेडेन क्रॉसने आपल्या या कन्येचे नाव ‘त्रिनिटी लीघ’ असे ठेवले आहे. आपले दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदित झालेला क्रॉस त्रिनिटीचे कौतुक करताना ‘सन’ वृत्तपत्राशी बोलताना म्हणाला की, माझ्यासाठी ती देवदूत आहे. मी खूपच भाग्यवान आहे. ती खूपच चांगली आहे. सर्वच दृष्टीने परिपूर्ण आहे!अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्याने आता लिंग परिवर्तनाची अर्धवट ठेवलेली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे हेडन क्रॉसने ठरविले आहे.एका अनाम दात्याकडून घेतलेले वीर्य वापरून आपण गरोदर असल्याचे हेडेन याने जाहीर केले, तेव्हा तो जगभर चर्चेचा विषय झाला होता. आपण अशा प्रकारे गर्भारपण का स्वीकारले, याचा खुलासा करताना त्या वेळी हेडन याने सांगितले होते की, लिंग परिवर्तन करून घेतले, तरी मी खऱ्या अर्थाने ‘पुरुष’ होऊ शकणार नाही. मी कोणत्याही मुलाचा पिता होऊ शकणार नाही, याची मला जाणीव झाली. लिंग परिवर्तनाने स्त्रीत्व पूर्ण गमाविण्याआधी गरोदर राहून मूल जन्माला घालायचे व नंतर लिंग परिवर्तन पूर्ण करून घ्यायचे, हाच माझ्यापुढे पर्याय होता. क्रॉस पूर्वी एका कपड्यांच्या दुकानात नोकरी करायचा, परंतु गरोदरपणामुळे त्याने नोकरी सोडली. त्रिनिटी एक वर्षाची झाली की, तो पुन्हा नोकरी शोधणार आहे. मात्र, प्रसूत होऊन मूल जन्माला घालणारा हेडेन क्रॉस हा जगातील पहिला पुरुष मात्र नाही. सन २००८ मध्ये अमेरिकेतील थॉमस बिटी हा प्रसूत होणारा पहिला पुरुष ठरला होता. थॉमस मुलगी म्हणून जन्माला आला होता. त्यानेही लिंग परिवर्तनाची प्रक्रिया अर्धवट करून घेतली होती व गर्भाशय कायम ठेवले होते. त्यामुळे गरोदर राहून प्रसूत होणे शक्य झाले होते.>गेल्या सप्टेंबरमध्ये वीर्यदानाने मी गरोदर राहिलो. मी फेसबूकवर शोध घेतला व मला वीर्यदात्यांचा एक गट मिळाला. त्यांच्यापैकी एकाने माझ्यासाठी वीर्यदान केले. आता तो गट बंद झाला आहे. त्यामुळे मला पैसेही द्यावे लागले नाहीत.- हेडन क्रॉस, बाळंत झालेला पुरुषहेडनचा अनोखा जीवनपटहेडनचे मूळ नाव पेगी.२१ वर्षांपूर्वी मुलगी म्हणून त्याचा जन्म झाला.तीन वर्षांपूर्वी पेगीने पुरुष होण्यासाठी लिंग परिवर्तन करून घेण्याचे ठरविले.ही प्रक्रिया अर्ध्यावर असताना, त्याने भविष्यात मुले होणे शक्य व्हावे, यासाठी आपली स्त्रीबिजे गोठवून ठेवण्याचा विचार केला.ब्रिटनमध्ये लिंग परिवर्तन प्रक्रियेस साधारणपणे २९ हजार पौंड खर्च येतो व हा खर्च राष्ट्रीय आरोग्य योजनेतून सरकार करते.परंतु पेगी उर्फ हेडनला स्त्रीबिजे गोठविण्यासाठी येणारा ४,००० पौंडाचा खर्च करण्यास राष्ट्रीय आरोग्य योजनेने नकार दिला.त्यामुळे त्या भानगडीत न पडता, त्याने फेसबूकवर वीर्यदात्याचा शोध घेतला. त्याला एक इच्छुक वीर्यदाता मिळाला व त्या वीर्याने हेडनची यशस्वीपणे गर्भधारणा झाली.
पुरुष प्रसूत होऊन जन्मले कन्यारत्न!
By admin | Published: July 10, 2017 12:18 AM