ऑनलाइन टीम
कराची, दि. १० - पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ मंगळवारी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी एअरपोर्ट सेक्यूरिटी फोर्सच्या (विमानतळ सुरक्षा दल) कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान सैन्य व निमलष्करीदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून सध्या दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या हल्ल्यात आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
कराची विमानतळाजवळील एएसएफच्या कॅम्पवर काही सशस्त्र दहशतवाद्यांनी मंगळवारी दुपारी हल्ला केला. कॅम्पमधून पुन्हा एकदा विमानतळावर प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे समजते. मात्र एएसएफच्या जवानांनी या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही. हा परिसर गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला आहे.
दरम्यान, गेल्या ४८ तासांता कराची विमानतळावरील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. रविवारी रात्री तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी विमानतळावर हल्ला केला होता. सुमारे सहा तासांच्या चकमकीनंतर या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांना यश आले होते. या हल्यात १० दहशतवाद्यांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला एक दिवस झाला असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे.