कराची : कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर घातक हल्ला घडवून आणल्याबद्दल येथील पोलिसांनी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या नेत्यांविरुद्ध दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) दाखल केला आहे. कराचीच्या विमानतळ पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात तालिबानचा प्रमुख मुल्ला फजलुल्लाह आणि प्रवक्ता शाहिदुल्ला शाहिद याच्यासह प्रमुख नेत्यांना आरोपी बनविण्यात आले आहे. विमानतळ सुरक्षा दलाच्या सहायक संचालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला. हल्लेखोर व शहरातील त्यांच्या म्होरक्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असल्याचे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद्यांना विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर आणून सोडणारे वाहन पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू आहे. (वृत्तसंस्था)