नवी दिल्ली : मुंबईवरील हल्ल्यात जिवंत पकडलेला व नंतर फाशी देण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब याने दहशतवादी हल्ल्याचे शिक्षण ज्या लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरात घेतले होते, त्याच शिबिरात उधमपूर येथील हल्ल्यात जिवंत हाती लागलेला आरोपी कासिम खान ऊर्फ नावेदने प्रशिक्षण घेतले होते असे वृत्त आता समोर आले आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी नावेद याला जिवंत पकडण्यात आले आहे. पाकिस्तानातील मानशेरा येथील लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरात नावेदला प्रशिक्षण मिळाले आहे. मर्कझ तय्यबा असे या शिबिराचे नाव होते. येथे नावेदला तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब यालाही दहशतवादाचे प्रशिक्षण मानशेरा येथे देण्यात आले. नावेदने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार १९६५ मध्ये पाकिस्तानात त्याचा जन्म झाला. पाचवीत त्याने शाळा सोडली असून, नंतर छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. वडील मारहाण करत असल्याने तो घरातून पळाला होता. २०१४ साली जमात-उद-दवा या संघटनेत तो सहभागी झाला. प्रशिक्षण केंद्रात काश्मीरसंबंधित व्हिडिओ दाखवले जात असत. काश्मीरमध्ये मुस्लिम नागरिकांवर अत्याचार होत असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे काश्मीरसाठी लढण्यास तयार झालो असे नावेदने सांगितले आहे. मीच त्या दहशतवाद्याचा दुर्दैवी बापउधमपूर येथील हल्ल्यात भारतीय नागरिकांच्या शौर्यामुळे पकडला गेलेला दहशतवादी मोहंमद नावेद हा पाकिस्तानीच असल्याच्या भारताच्या आरोपांना बळ मिळाले आहे. कारण ‘मीच तो नावेदचा दुर्दैवी बाप’ अशी कबुली नावेद याचा पिता मोहंमद याकूब या पाकिस्तानी नागरिकाने दिली. लष्कर-ए-तोयबा आमच्या मागावर आहे, पाकिस्तानी लष्करही आमच्या मागावर असून, आम्ही तोंड उघडले तर मला मारून टाकतील असे मोहंमद याकूब याने वृत्तपत्राला सांगितले. उधमपूर येथे पकडल्या गेलेल्या नावेदने दिलेल्या फोन नंबरवर भारतीय अधिकाऱ्यांनी फोन लावला. तेव्हा पंजाबी भाषेत बोलत नावेदच्या पित्याने कबुली दिली आहे. तुम्ही भारतातून फोन करत आहात. ते आम्हाला मारून टाकतील. मीच तो दुर्दैवी बाप, असे मोहंमद याकूबने सांगितले. नावेद याने भारतात हल्ला केल्यानंतर, त्याच हल्ल्यात तो मारला जावा अशी त्यांची इच्छा असेल. कारण लष्कर-ए-तोयबा आमच्या मागावर आहे. असे घाबरलेल्या मोहंमद याकूब यांनी सांगितले. नावेदला सोडा अशी विनंतीही त्यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कसाब, नावेदला एकाच शिबिरात धडे
By admin | Published: August 07, 2015 10:11 PM