बिआरित्झ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-7 देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता असून, या चर्चेमध्ये काश्मीरचा विषय निघू शकतो. जी-7 देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जपान यांचा समावेश आहे. जगातील सात धनाढ्य देशांच्या या परिषदेत भारत हा विशेष निमंत्रित सदस्य आहे. जागतिक अर्थव्यस्थेत आलेली मंदी आणि व्यापार युद्धाबाबत वाढत असलेली चिंता या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे बिआरित्झ येथे जेव्हा जी-7 परिषदेच्या मंचावर विविध देशांचे नेते एकत्र येतील तेव्हा त्यांच्याकडून व्यापार युद्धाबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा जगाला असेल. जगातील सर्वात विकसित देशांच्या या समुहाच्या वार्षिक बैठकीत अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग, ब्रेक्झिटनंतर युरोपमध्ये निर्माण झालेला गतिरोध संपवणे तसेच व्यापारामधील तणावाचे वातवरण कमी करणे अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, अॅमेझॉनच्या जंगलात लागलेली आग ही या बैठकीच्या अजेंड्यावर सर्वात वर असेल, असे फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्राँ यांनी देशाला संबोधित करताना सांगितले होते. या विषयी केवळ चर्चा करून भागणार नाही, तर काहीतरी योग्य पावले उचलली पाहिजेत, असे मॅक्राँ यांनी म्हटले आहे.
जी-7 देशांच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:45 PM