लंडन : उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. उरी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा दावा करताना काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेले गोळीबार, त्यात अनेकांचे झालेले मृत्यू, जखमींची संख्या हजारांच्या घरात असणे, कैक लोकांना अंधत्व येणे यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच उरी हल्ला झाला असावा, अशा शब्दांत उलट्या बोंबा मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे.उरी येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत पुराव्याशिवाय पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहे, असा आरोपही शरीफ यांनी केला. काश्मीरमध्ये भारत सरकारकडून जे अन्याय, अत्याचार सुरू आहेत, त्याची उरी हल्ला हा प्रतिक्रिया असू, शकते, असे सांगून, शरीफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी अजिबात संबंध नाही, असेच नमूद केले. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात भाषण करून पाकिस्तानला निघालेले शरीफ काही काळ लंडनमध्ये थांबले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केला. संयुक्त राष्ट्रांत शरीफ यांनी ८ जुलै रोजी काश्मीरमध्ये चकमकीत ठार झालेला बुरहान वणी याचे वर्णन त्यांनी काश्मिरी जनतेचा नायक असे केले होते. नवाझ शरीफ यांनी थेट दहशतवाद्याचे उदात्तीकरण केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.रविवारी पहाटे उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे सबळ पुरावे असून, भारताने ते पुरावे पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे सोपवले आहेत. जानेवारी महिन्यात पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेनेच उरीमध्ये हल्ला घडवून आणला होता, असे तपासात आढळून येत आहे. तरीही भारत बेजबाबदारपणे वागत नसल्याचा आणि तपासाशिवाय आरोप करत असल्याचा उलटा आरोप शरीफ यांनी केला. (वृत्तसंस्था)प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाहीउरी येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत पुराव्याशिवाय पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहे, असा उलटा आरोपही नवाझ शरीफ यांनी केला. काश्मीरमध्ये भारत सरकारकडून जे अन्याय, अत्याचार सुरू आहेत, त्याची उरी हल्ला हा प्रतिक्रिया असू शकते, असे सांगून शरीफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अजिबात संबंध नाही, असेच नमूद केले. संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान एकाकीसंयुक्त राष्ट्रे : काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी पाकिस्तानचे सुमारे महिनाभरापासून सुरू असलेले प्रयत्न असफल झाले आहेत. दहशतवादाशी लढण्यावरच संयुक्त राष्ट्रांनी भर दिला आहे. त्यामुळे या मुद्यार पाकिस्तान एकाकी पडला आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली.अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण चर्चेत आतापर्यंत १३१ देशांची भाषणे झाली आहेत. त्यापैकी १३0 देशांनी पाकिस्तानने उपस्थित केलेला मुद्दा टाळला आहे. याचा अर्थ काय होतो. संयुक्त राष्ट्रांच्या ७१ व्या सर्वसाधारण सभेत बोलणाऱ्या ९0 टक्के देशांनी दहशतवाद हाच आपल्या चिंतेचा प्राथमिक मुद्दा असल्याचे नमूद केले.
काश्मीरची अस्वस्थता हे उरी हल्ल्याचे कारण
By admin | Published: September 25, 2016 3:10 AM