लॉस एंजिलिस - इराकमधील इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानीला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केल्यानंतर अमेरिका आणि इराक यांच्यातील तणाव वाढला आहे. याचदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, सुलेमानीने नवी दिल्ली येथे दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र रचलं होतं. अनेक निर्दोष लोकांची हत्या त्याने केली. भारतातील नवी दिल्ली आणि लंडन येथे दहशतवादी हल्ल्याचा डाव त्याने आखला होता.
यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आज आम्हाला सुलेमानी याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित लोकांची आठवण येते. आम्हाला समाधान मिळतं की त्यांच्यावरील दहशतीचं सावट दूर झालं आहे. मात्र यावेळी त्यांनी भारतातील कोणत्या दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्राचा उल्लेख केला याची माहिती दिली नाही.
२०१२ मध्ये इस्राईल राजदूताच्या पत्नीच्या कारमध्ये भारतात झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा उल्लेख केल्याचे समजते. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटात ताल येहोशुआ कोरेन जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या व्यतिरिक्त त्यांचा ड्रायव्हर आणि जवळ उभे असलेले इतर दोन लोकही जखमी झाले होते.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले होते की, या हल्ल्यामागे इराणचा हात होता आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून जॉर्जियामध्येही हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. हे प्रकरणाचा अद्यापपर्यंत छडा लागला नाही. तसेच भारतानेही या प्रकरणात इराणचा हात असल्याचं विधान केलं नाही.
२०१२ च्या वृत्तानुसार, इराणने तेहरानमध्ये अणुशास्त्रज्ञ मुस्तफा अहमदी रोशन यांच्या हत्येला उत्तर म्हणून हा हल्ला केला होता. इस्राईलने या अणू वैज्ञानिकांची हत्या केल्याचा आरोप आहे. सय्यद मोहम्मद अहमद काझमी या भारतीय पत्रकाराला त्याच वर्षाच्या 6 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप लावण्यात आला होता. परदेशात न जाण्याच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याला जामीन मंजूर केला होता.
अमेरिकेने इराणच्या लष्कर प्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करून ठार केले. यामुळे इराण संतप्त झाला असून जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे.