आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना अटकेचे आदेश दिले आहेत. यामुळे रशिया खवळला असून आकाशाकडे लक्ष असुद्या, सुपरसॉनिक मिसाईल कधीही कोसळेल अशी धमकी दिली आहे. रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी देव आणि मिसाईलपासून वाचणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.
युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली आयसीसीने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. आयसीसीला एक निरुपयोगी आंतरराष्ट्रीय संस्था म्हटले आहे. मेदवेदेव यांनी त्यांच्या टेलिग्राम खात्यावर लिहिलेल्या निवेदनात न्यायमूर्तींना आकाशाकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. समुद्रात रशियन युद्धनौकेवरून डागलेले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हेगमधील आयसीसीच्या मुख्यालयावर पडण्याची शक्यता आहे. हे मिसाईल थांबविणे न्यायालयाला अशक्य होईल. न्यायालय नाटोचे सदस्य नाही, त्यामुळे या हल्ल्यानंतर कोणतेही युद्ध सुरू होणार नाही. तसेच या हल्ल्याचा कोणाला कोणताही पश्चाताप होणार नाही, असे मेदवेदेव म्हणाले आहेत.
अटक वॉरंट जारी झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी न्यायाच्या बाजूने असल्याचे म्हटले होते. युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांना पुतिन जबाबदार असल्याने हे वॉरंट योग्य असल्याचे समर्थन त्यांनी केले होते.
तर दुसरीकडे रशियाने हे कोर्ट आपल्याला बांधील नसल्याचे म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी अटक वॉरंट कादेशीररित्या रशियासाठी निरर्थक आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा रशिया सदस्य नाही. यामुळे त्यांचे कायदे आम्हाला लागू होत नाहीत, असे म्हटले होते.