अलबमा : ख्रिसमस अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. तसंच नेटिझन्सही आता सज्ज झालेत. विविध कल्पना लढवून ते ख्रिसमस साजरा करण्यासाठी तयार होताहेत. त्याचप्रमाणे एका तरुणीनेही एक शक्कल लढवली आणि ती शक्कल तिच्याच अंगलट आली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील युनिर्व्हिसिटी ऑफ अलबमामध्ये शिकणारी केल्सी हॉल या २० वर्षीय तरुणीने ख्रिसमस ट्रीचा वेश परिधान करून फोटो ट्विटवर अपलोड केला होता. त्याखाली या फोटोला तिने दिलेला कॅप्शन असा होता की, ' या फोटोला जर १००० रिट्विट मिळाले तर मी असा वेष माझी सेमिस्टर संपेपर्यंत परिधान करेन'. सुरुवातीला तिला वाटलं की या फोटोला १००० रिट्विट नाही मिळणार. पण सोशल मीडियावर काहीही होऊ शकत. नेटिझन्स काहीही करू शकतात. बघता बघता तिचे फोटो ३० हजार वेळा रिट्विट आणि ५४ हजार लाईक्स मिळाले. आता तिने केलेलं आवाहन पूर्ण करणं तिचं कर्तव्य होतं. पण तिने आपलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला. झाली की नाही पंचाइत? हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाल्यावर तिही अचंबित झाली. आता आपल्याला आपला शब्द पूर्ण करावा लागणार या भीतीने तिने सरळ मी हे करू शकत नाही असं ट्विटरवर सांगितलं. एका अर्थाने तिनं प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लढवलेली शक्कल तिच्याच अंगलट आली.
या सगळ्या प्रकारात खुद्द ट्विटरचे ऑफिशिअल हँडलही सहभागी होतं. तिने जेव्हा पहिला फोटो पोस्ट करून १००० रिट्विट देण्याचा आवाहन केलं तेव्हा खुद्द ट्विटरच्या ऑफिशिअल हँडलवरूनही तो फोटो रिट्विट झाला आणि बघता बघता सगळ्यांपर्यंत तो पोहोचला. आता तिच्या फोटोला हजाराहून रिट्विट मिळाले म्हणजे तिने तिचं आश्वासन पूर्ण करणं भाग होतं. पण तिनं असं करण्यास चक्क नकार दिला. मी असं करू शकत नाही, असं टि्वट करून तिनं पुन्हा नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं.
तिच्या या नकारावर नेटिझन्सने बरीच टीका केली. खुद्द ट्विटरचं ऑफिशिअल हँडल या सगळ्या प्रकारात सहभागी असल्यानं तिला तिचं आश्वासन पूर्ण करणं भाग ठरलं. शेवटी तिने तिचा हा टास्क पूर्ण करायचा ठरवला.
तिच्या सेमिस्टरपर्यंत ख्रिसमस ट्रीचा वेश परिधान करण्यासाठी ती राजी झाली. तिने तिचे ख्रिसमस ट्रीचा वेष परिधान केला आणि चार दिवस ती ते फोटो ट्विटवर अपलोड करत होती. त्यामुळे, तुम्हीही जर सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याकरता अशा काही युक्त्या लढवत असाल तर सावधान. कारण नेटिझन्स कोणालाही तोंडावर पाडू शकतात. तुम्ही लढवलेली शक्कल तुमच्याच अंगलट येऊ शकते. जे आश्वास तुम्ही पूर्ण करू शकता, तेच आश्वासन द्या, नाहीतर केल्सी हॉलसारखी कुंचबना तुमचीही होऊ शकते.