ढाका : बांगलादेश सरकारच्या विरोधात ७२ तासांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर विरोधी पक्षनेत्या आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या घराची वीज तोडण्यात आली असून बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) एका नेत्याची उचलबांगडी करून सरकारने दडपशाहीचा अवलंब केला आहे.वीजपुरवठा तोडल्यानंतर तासाभराने प्रशासनाने झिया यांच्या घराचे इंटरनेट कनेक्शन आणि केबलही तोडली. झिया यांना घराबाहेर पडताच येऊ नये म्हणून ३ जानेवारीपासून झिया यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस वाहने तसेच वाळू, सिमेंट, विटांनी भरलेले ट्रक तैनात करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)पंतप्रधान शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची धार कमी होऊ नये म्हणून बीएनपी नेत्या खालेदा झिया ४ जानेवारीपासून राहत असलेल्या गुलशन कार्यालयाचा पुरवठा सरकारच्या अखत्यारीतील ढाका वीज वितरण कंपनीने तोडला आहे. कार्यालयातच त्यांचे घरही आहे.शेख हसीना यांच्या पक्षाने उद्या, रविवारपासून ७२ तासांच्या देशव्यापाी संपाची हाक दिली आहे. उद्याच शालेय परीक्षा सुरू होत असून १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. संप आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने पाल्यांच्या भवितव्याबाबत चिंतित पालकांनी खालेदा झिया यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने करीत संप मागे घेण्याचे आवाहन केले.दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दडपशाहीचा अवलंब करीत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या जलद कृती पथकाने बीएनपीचे प्रवक्ते रूहूल कबीर रिझवी यांची शुक्रवारी रात्रीच राहत्या घरातून उचलबांगडी केली. बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनीही पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनीही यासाठी पोलीस आणि जलद कृती दलाला पुरेशी मोकळीक दिली आहे.
खालेदा झियांच्या घराची वीज तोडली
By admin | Published: January 31, 2015 11:38 PM