Gurpatwant Singh Pannu:भारताच्या एका माजी अधिकाऱ्याने खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विकास यादव याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने हवाई प्रवाशांना पुन्हा धमकी दिली आहे. पन्नू याने शीख हत्याकांडाच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत असतानाच पन्नू याने हा इशारा दिला आहे. त्यामुळे यामध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भारताला जाणारी विमाने उडवून देण्याची धमकी दिली आहे. पन्नू याने एका व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाने उड्डाण करु नका असे सांगितले आहे. शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण होत असताना एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असे पन्नूने म्हटलं आहे. पन्नूने हा इशारा अशा वेळी दिला आहे जेव्हा विमान वाहतूक सतत बॉम्बच्या अफवांना तोंड देत आहे. रविवारीही या धमक्यांमुळे अनेक उड्डाणे प्रभावित झाली होती.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शीख फॉर जस्टिसचे प्रमुख पन्नूने प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानांमधून प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीही पन्नूने अशीच धमकी दिली होती. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने पन्नूला देशद्रोह आणि फुटीरतावादाच्या आरोपाखाली दहशतवादी घोषित केले आहे. पन्नूने नोव्हेंबर २०२३ मध्ये एका व्हिडिओमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलले जाईल आणि ते १९ नोव्हेंबरला बंद राहील, असं म्हटलं होतं. त्या व्हिडिओमध्ये त्याने त्या दिवशी लोकांना एअर इंडियाने उड्डाण करण्यास मनाई केली होती.
भारतीय विमान कंपन्यांना वारंवार धमक्या
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांना धमक्या येत आहेत. एअर इंडिया व्यतिरिक्त आकासा एअर, विस्तारा, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. डीजीसीए या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. दुसरीकडे, शनिवारी वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.