लंडन - ब्रिटनमध्ये हिंसक प्रसारण करून शीख (sikhs) समाजाला भडकवणाऱ्या खालसा टीव्ही (Khalsa TV ) लिमिटेडवर मोठा कारवाई करण्यात आली आहे. ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणारी संस्था असलेल्या ऑफकॉमने खालसा टीव्ही लिमिटेडवर सुमारे ५० लाख रुपये ( ५० हजार पौंड्स) एवढा दंड ठोठावला आहे. ऑफकॉमने भारतातील (India) हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या एका म्युझिक व्हिडीओचे प्रसारण केल्याबद्दल आणि शीख फुटीरतावाद्यांच्या कामाचा टीव्हीवर गौरव केल्या प्रकरणी खालसा टीव्हीला दोषी ठरवले आहे. (Khalsa Television Limited Fined In UK)
एवढेच नाही तर खालसा टीव्हीला अशा चर्चात्मक कार्यक्रमांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. ज्यामध्ये शीख धर्मावर टीका करणाऱ्यांविरोधात हिंसा करण्यास तसेच एका दहशतवादी समुहाला वैध ठरवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते.
म्युझिक व्हिडीओ बग्गा अँड शेरामधील गाणे जुलै २०१८ मध्ये खालसा टीव्हीवर प्रसारित करण्यात आले होते. यामध्ये इंदिरा गांधी यांचे छायाचित्र दाखवण्यात आले होते. या छायाचित्रामध्ये त्यांच्या तोंडातून रक्त टपकत होते. या फोटोच्या खाली आक्षेपार्ह ओळी लिहिण्यात आल्या होत्या. तसेच या व्हिडिओमध्ये एक गाणे वाजत होते. तसेच लाल किल्ला जळताना दिसत होता.
ऑफकॉमने याबाबत आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्या मते, या व्हिडीओमधील फोटो आणि त्यामधील उल्लेख हा भारताविरोधात हिंसात्मक कारवाईसाठी उद्युक्त करणारी आहेत. तसेच अशी कृत्ये करणाऱ्या लोकांचा उदोउदो करणारी आहेत.
ऑफकॉमने पुढे म्हटले आहे की, व्हिडीओमध्ये परोक्ष रूपाने शीख दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे. यामध्ये ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणाऱ्यांच्या हत्या करणाऱ्यांचाही समावेश आहे. ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणाऱ्यांची हत्या करणाऱ्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता.