इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या झळा आता इराणलाही बसू लागल्या आहेत. हल्लीच सिरियामध्ये इस्राइलने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन भीषण बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला. कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने चार वर्षांपूर्वी एका ड्रोन हल्ल्यामध्ये हत्या केली होती. दुसरीकडे इराणच्या मदतीने चालणाऱ्या हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांवही प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडींनंतर इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी करमानमध्ये हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी इराणच्या कमांडोंना आदेशही दिला आहे. इराणी नेते अली खोमेनी यांनी अमेरिकी सैन्याविरोधात थेट लढण्यास मनाई केली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या योध्यांच्या माध्यमातून लाल समुद्राला संघर्षाच्या आगीने लालेलाल करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इस्राइलबाबत खोमेनी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अमेरिकेच्या मदतीशिवाय हे सर्व घडलं नसतं. याआधी इस्राइलवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन खोमेनी यांनी मुस्लिम देशांना केलं होतं. हमानसने केलेल्या हल्ल्यानंतर चवताळलेल्या इस्राइलने केवळच गाझापट्टीतट नाही तर लेबेनॉन आणि सिरियामधूनही आपल्या शत्रूंना वेचून वेचून ठार मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांमागे इस्राइलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.