इस्लामाबाद: जागतिक टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झाली. सर्वांत कहर म्हणजे एका सोशल मीडिया युझरने विराटच्या दहा वर्षाच्या मुलीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एका मंत्र्याने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित आहे. विराटने पाकिस्तानमध्ये निघून यावे, असे म्हटले आहे.
विराट कोहलीच्या अवघ्या १० महिन्यांच्या मुलीला अत्याचाराच्या धमक्या मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मीडिया रिपोर्ट्सची दखल घेऊन दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यानेही विराटच्या कुटुंबाला मिळालेल्या धमकी प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. यातच आता पाकिस्तानातील मंत्री खुर्रम नवाझ गंडापूर यांनी विराटला एक सल्ला दिला आहे.
अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित, विराट तू इथे ये
पाकिस्तान अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित आहे. आम्ही तुमच्या व्यावसायिक क्रिकेटचा आणि तुमच्या कुटुंबाचा आदर करतो. पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या कोणत्याही संघाबाबत आपण अपशब्द केली आहे का, अशी विचारणा करत आमच्या खेळाडूंनी सामना गमावल्यास त्यांच्या कुटुंबांवर आम्ही कधीही हल्ला करत नाही. हिंदुत्व भारताचा नाश करेल. विराट तू पाकिस्तानात ये, असे ट्विट गंडापूर यांनी केले आहे.
दरम्यान, पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट करत, प्रिय विराट, या लोकांमध्ये प्रचंड द्वेष भरला गेला आहे कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा. संघाचे रक्षण करा, असे म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी मोहम्मद शामीवर टीका करणाऱ्यांनाही सुनावले. मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलेच नसते. त्यांना माफ करुन टाक, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.