कॅरोलिना-
सोशल मीडियाच्या सहाय्यानं आपण क्षणार्धात अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य करु शकतो. अनेक नव्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकताही येतात. जसे सोशल मीडियाचे तोटे आहेत तसे त्याचे फायदे देखील अनेक आहेत. टिकटॉक या सोशल मीडियातील सुप्रसिद्ध अॅपमुळे उत्तर कॅरोलिनामधील एका १६ वर्षीय मुलीचा जीव वाचला आहे. संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.
१६ वर्षीय मुलीनं आपल्या हातांचा वापर करत मदतीसाठी इशारा केला होता. अपहरणकर्ते या मुलीला कारमधून घेऊन जात असताना तिनं हाताच्या ठराविक इशाऱ्यानं संकटात असल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. जवळच उभ्या असलेल्या एकानं तिचा सांकेतिक इशारा ओळखला आणि पोलिसांनी याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली.
ज्या वाहनातून मुलीचं अपहरण केलं जात होतं. त्या वाहनाच्या मागे पोलिसांना माहिती देणाऱ्या व्यक्तीचं वाहन होतं. त्यानं मुलीला आपण संकटात असल्याचा सांकेतिक इशारा करत असताना पाहिलं होतं. टिकटॉकवर अशा पद्धतीच्या इशाऱ्याचा एक व्हिडिओ त्यानं पाहिला होता. त्यातूनच संबंधित मुलगी संकटात असून तिचं अपहरण झालेलं असल्याचं त्या सुजाण नागरिकाच्या लक्षात आलं. त्यानं तातडीनं ९११ क्रमांकावर फोन करुन पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणात जेम्स हार्बर्ट ब्रिक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. १६ वर्षीय मुलीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अपहरण करणाऱ्या व्यक्तीला ती ओळखते. 'सिग्नल फॉर हेल्प' अभियानाअंतर्गत संकटात असताना सांकेतिक खूणा करुन इतरांना माहिती देण्याची युक्ती शोधून काढण्यात आली. याचाच वापर अपहरण झालेल्या १६ वर्षीय मुलीनं केला. हाताची चार बोटं उंचावून त्यात अंगठा बंद करावा आणि त्यानंतर मूठ बंद करुन आपण संकटात सापडलो आहोत अशी ही खूण आहे. ज्यात तुम्हाला अज्ञातांनी घेरल्याचा इशारा तुम्ही देत असता आणि मदतीचा संकेत देता. याच सांकेतिक इशाऱ्याचा फायदा झाला आणि संबंधित मुलीचा जीव वाचला.