काबूल:अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं आपल्या सैन्याला पहिलं मिशन दिलं आहे. तालिबाननं त्यांच्या सैन्याला दिलेलं पहिललं मिशन म्हणजे अमेरिकन लष्कर किंवा सरकारला पाठिंबा देणाऱ्यांना शोधणे आणि त्यांना संपवणे. यासाठी तालिबाननं एक 'किल लिस्ट'देखील तयार केली आहे. आता या लिस्टमधील लोकांना शोधण्यासाठी तालिबानी सैनिक घरोघरी जाऊन संबंधित लोकांना शोधत आहेत.
'हे' लोक आहेत निशाण्यावर
'द सन'च्या वृत्तानुसार, राजधानी काबूलमध्ये तालिबानी सैनिक घरोघरी जाऊन अमेरिकन सैन्याला मदत करणाऱ्यांना शोधत आहेत. यामध्ये पोलीस, लष्करी कर्मचारी, सरकारी अधिकारी, परदेशी स्वयंसेवी संस्थांशी संबंधित कामगार आणि पत्रकार यांचा समावेश आहे. काबूलमध्ये अडकलेल्या 'रेडिओ फ्री युरोप'चे पत्रकार सय्यद मुस्तफा काझमी यांनी ट्विटरवरुन तालिबानच्या या कारवाईची माहिती दिली आहे.
पत्रकारांच्या घराची झडती
त्यांनी लिहिले, “तालिबानी दहशतवादी घरोघरी जाऊन सरकारी अधिकारी, माजी पोलीस आणि लष्करी कर्मचारी, परदेशी स्वयंसेवी संस्था किंवा अफगाणिस्तानच्या विकासासाठी काम करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत किमान तीन पत्रकारांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. काबूलमध्ये राहणे आता धोकादायक बनत असून, पुढे काय होईल हे कोणालाही माहित नाही, आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करा.
महिलांची यादीही तयार
तालिबाननं सरकार आणि माध्यमांसोबत काम करणाऱ्या महिलांची यादीही तयार केली आहे. काबूलच्या रस्त्यावर तालिबानी दहशतवादी तैनात असून, प्रत्येक येणाऱ्याची तपासणी केली जात आहे. तसेच, कलाकारांना खुलेआम मारुन त्यांची वाद्ये तोडली जात आहेत. मुळात तालिबानच्या राजवटीत महिलांना ना कुठले अधिकार आहेत ना कलाकारांसाठी कोणतेही स्थान.
कंधार स्टेडियमवर पब्लिक एक्झीक्यूशन
अफगाण नागरिकांना अमेरिकेत स्थायिक होण्यास मदत करणाऱ्या 'नो वन लेफ्ट बिहाइंड' या संस्थेचे सह-संस्थापक झेलर यांनी अल जझीराला सांगितले की, काबूलमधून येणाऱ्या बातम्या भयानक आहेत. कंधार स्टेडियममध्ये अनेकांना सर्वांसमोर ठार मारले जात आहे. अमेरिकन लष्करासाठी काम करणाऱ्या दुभाष्यांना तालिबानचा सर्वात जास्त धोका आहे. कारण, तालिबान या दुभाष्यांना आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवल्यानंतर हे दुभाषी त्यांच्या कुटुंबियांसह भूमिगत झाले आहेत.