सीरियामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रपती बशर अल असद यांची सत्ता उलथवून लावण्यात आली. त्यानंतर बशर अल असद यांनी राजधानी दमिश्क येथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ज्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान बंडखोरांनी पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. ओपन सोर्स डेटा ट्रॅकर फ्लाईट रडार २४.कॉमने दिलेल्या माहितीनुसार दमिश्क विमानतळावरून एका सीरियन विमानाने उड्डाण केले होते. हे विमान सुरुवातीला सीरियाच्या किनारी भागात जात होते.
मात्र उड्डाण केल्यानंतर विमानाने अचानक आपली दिशा बदलली तसेच विरुद्ध दिशेला काही मिनिटांपर्यंत प्रवास केल्यानंतर हे विमान रडारवरून गायब झाले. या विमानाचं लास्ट लोकेशन होम्स शहराजवळ होते, हा भाग बंडखोरांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. फ्लाइटच्या डेटानुसार रडारवरून गायब होण्यापूर्वी विमानाची उंची ३ हजार ६५० मीटरवरून १ हजार ७० मीटरपर्यंत खाली आली होती. त्यावरून या विमानावर हल्ला झाला किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र डेटामध्ये काही विसंगती असू शकतात, हे फ्लाईटरडारने मान्य केलं आहे. त्यांनी त्यासाठी विमानाचे जुने ट्रान्स्पाँडर आणि परिसरामधील जीपीएस जॅमिंगला जबाबदार धरले आहे. मात्र त्यांनी उपलब्द असलेला डेटा विमानाच्या फ्लाय वे ची चांगली माहिती देतो, असेही सांगितले.
दरम्यान, या विमानामधून कोण कोण प्रवास करत होते हे समोर येऊ शकलं नाही. मात्र रॉयटर्सने सीरियन सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बशर अल असद यांना घेऊन जाणाऱ्या या विमानाच्या थ्री डी फ्लाइट डेटामधून हे विमान कोसळले असण्याची शक्यता आहे. सीरियन एअरचं आयएल-७६ विमान हवेतून वेगाने खाली आलं. तसेच ते पाडण्यात आलं असण्याची शक्यता आहे.