कराची : पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार आणि भारतातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या शाहिद लतीफची बुधवारी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
मोटारसायकलवरून आलेल्या तीन बंदूकधारींनी फजरच्या नमाजानंतर पंजाबमधील डस्का येथील नूर मदिना मशिदीजवळ लतीफ आणि त्याच्या दोन साथीदारांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ४१ वर्षीय शाहिद लतीफ हा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा सदस्य होता. लतीफने सियालकोट येथून हल्ल्याचे सूत्रसंचालन केले होते आणि कट तडीस नेण्यासाठी त्याने जैशच्या ४ दहशतवाद्यांना पठाणकोटला पाठवले होते.
१६ वर्षे काढली जम्मूच्या तुरुंगातबेकायदा कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) दहशतवादाच्या आरोपाखाली नोव्हेंबर १९९४ मध्ये लतीफला भारतात अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खटला चालवण्यात आला. त्याने मसूद अझहरसोबत १६ वर्षे जम्मूच्या कोट बलवाल तुरुंगात काढली. भारतात शिक्षा भोगल्यानंतर तो २०१० मध्ये वाघामार्गे पाकिस्तानात गेला.